मोठी बातमी..! शिवसेना पदाधिकारी हल्ला प्रकरण,चार संशयित ताब्यात

18 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास एमजी रोड येथे शिवसेनेचे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून शाही फेकण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित हल्लेखोर आज स्वतःहून भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.
निलेश कोकणे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर शहरात विविध चर्चेला उधाण आले होते . त्यानंतर शिंदे गटातील लोकांनी सुपारी देऊन हल्ला केल्याचा शिवसेनेने आरोप केला होता .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 तारखेला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या या दौऱ्याच्या दिवशी नाशिक शहरातील शिवसैनिक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार होते परंतु कालपासून शहरात पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू केल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांची भेट घेतली यादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच पोलीस आयुक्तांनी देखील हल्लेखोर निष्पन्न झाल्याचे सांगत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नुसतच आश्वासन न घेता लेखी आश्वासन देण्याची मागणी केली होती. परंतु आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नाशिक शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर निलेश कोकणे यांच्यावर हल्ला करणारे संशयित हल्लेखोर स्वतः भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ज्यावेळी गुवाहटी गेले होते त्यावेळी शिंदे यांच्या समर्थकांनी नाशकात बॅनरबाजी केली होती. या दरम्यानच एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते या बॅनर वर काळे फासण्यात आले होते. त्या निदर्शन आंदोलनात निलेश कोकणे यांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली होती. निलेश कोकणे यांच्यावर देखील हल्लेखोरांनी हल्ला करून शाही टाकली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी शिंदे समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता आणि अशा प्रकारच्या चर्चा देखील शहरात रंगू लागल्या होत्या