केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्विट मुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण फुटले होते. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती असा आरोप केला होता. आता या आरोपाला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी या वादात उडी घेत. श्रीधर नाईक,सत्यविजय भिसे,अंकुश राणे,गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे, असे सांगत सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.असा गंभीर आरोप नाईक यांनी नितेश राणेंसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे.
यावेळी आमदार वैभव नाईक माध्यमांची संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंचे शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आहे. शिंदे गट झाल्यामुळे नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपण चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत.सुपारीबाज कोण आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.