नाशिक जिल्ह्यात पावसाने कहर घातला असून पुराच्या पाण्यात तीन जण वाहून घेल्याची घटना घडली आहे.जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सर्वच नाशिक जिल्हा जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक रस्त्यांना देखील नदीचे स्वरूप आले आहे. या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते पाण्या खाली गेल्याच्या आणि वाहून गेल्याची घटना देखील घडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात चालू असणाऱ्या सतत धारांमुळे धरणांच्या पाणी पातळी वाढ होत असल्याने अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याच्या विसर्गामुळे सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत.अश्या पूलावरून वापर करणे नागरिकांच्या चांगलेच जीवावर बेतले आहे.दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव मध्ये नदी पार करताना काका आणि सहा वर्षाची मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे.
यात काकाला वाचवण्यात यश आले आहे तर मुलगी बेपत्ता झाली आहे.
अशाच प्रकारची आणखी दुसरी घटना पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली आहे. त्र्यंबकेश्वरच्या तळेगाव मधील 34 वर्षीय इसम कीव नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. सलग चालू असलेल्या मुसळधार पावसाने त्रंबकेश्वर तालुका देखील झोडपून काढला आहे. त्र्यंबकेश्वर मधील मुख्य बाजारपेठेत देखील पाणी शिरले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वच नदी नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अधिक दिसून येत आहे. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असताना देखील अशा घटना घडत आहेत. या मुळे आता प्रशासनाची चांगलीच डोके दुखी वाढली आहे.