By चैतन्य गायकवाड |
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड चालू आहे. शिवसेनेचे नेते (Shivsena leader) आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ( Minister for Urban Development and Public Works) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमधील (Gujrat) हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत सुरत (Surat) येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही नेते नाराज एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याचे देखील वृत्त आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपले दूत एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुरतकडे रवाना केले आहेत.
राज्यातील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM and party chief Uddhav Thackeray) यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांची बैठक बोलावल्याची माहिती हाती आली आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Nashik MP Hemant Godse) यांनी दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्याची माहिती आल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त असल्याची चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागली होती. काल उशिरा देखील वर्षा बंगल्यावर बैठक सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेस आमदारांची देखील बैठक होणार… राज्यात सुरु असलेल्या या ‘हाय व्होल्टेज’ ड्रामाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) महत्त्वाचे नेते आणि आमदार आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या आमदारांची देखील बैठक होणार असल्याची माहिती आहे. तसेच काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमदेवार चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) पराभूत झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची देखील बैठक होणार आहे.