By चैतन्य गायकवाड
पाटणा : महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय अस्थैर्य (political instability) निर्माण झालेले असल्याने आता संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागून आहे. असे असतानाच बिहारमधील (Bihar) राजकीय वातावरण देखील तापले आहे. एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना तगडा धक्का बसला आहे. एमआयएमच्या चार आमदारांनी (four MLAs) राष्ट्रीय जनता दलात (RJD) प्रवेश केला आहे. या आमदारांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षप्रवेशाने बिहार विधानसभेमध्ये (Bihar Legislative Assembly) सर्वाधिक आमदार आता राजदकडे झाले आहेत. बिहार विधानसभेत एमआयएमचे पाच आमदार होते, मात्र यातील चौघांनी पक्षाला रामराम केला आहे. आज तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या आमदारांनी राजदमध्ये प्रवेश केला.
मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे पाच आमदार निवडून आले होते. कोचाधामन मतदारसंघातून मोहम्मद इजहार अस्फी, जोकीहाट मतदारसंघातून शाहनवाज आलम, बायसी मतदारसंघातून सय्यद रुकनुद्दीन अहमद, अमौर विधानसभा मतदारसंघातून अख्तरूल ईमान आणि बहादुरदुगंज मतदारसंघातून मोहम्मद अनजार नईमी हे पाच जण एमआयएमच्या तिकिटावर आमदार म्हणून विजयी झाले होते. या पाच आमदारांपैकी अमौरचे आमदार अख्तरूल ईमान वगळता इतर चौघांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आमदार अख्तरुल इमान हे एकमेव एमआयएमकडे उरले आहेत आणि ते अमौर मतदारसंघाचे आमदार आहेत. उर्वरीत चार आमदारांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहार विधानसभेत राजदचे बळ सर्वाधिक..
दरम्यान, बिहार विधानसभेमध्ये राष्ट्रीय जनात दलाचे पक्षीय संख्याबळ इतर पक्षांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राजदचे ७५, तर भाजपचे ७४ आमदार निवडून आले होते. व्हीआयपीच्या तिकीटावर चार आमदार निवडून आले होते. यातील एका आमदाराचे निधन झाले तर इतर तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ७७ (७४+३) वर पोहोचले. तर, २०२२ ला झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये (bypoll) एक जागा राजदने जिंकल्याने त्यांचा आकडा ७६ वर पोहोचला. परंतु, आता एमआयएमचे चार आमदार राजदकडे आल्याने त्यांचे पक्षीय संख्याबळ सर्वाधिक ८० इतके झाले आहे. बिहारच्या सीमांचाल भागात बहुतांश मतदारसंघ हे मुस्लीम बहुल आहे. या सीमांचाल भागात विधानसभेच्या २४ जागा आहे. या भागातून एमआयएमला मोठा विजय मिळाला होता.