मलिक यांना मंत्रिपदावर ठेवणे हा राज्याचा अपमान!

मुंबई । प्रतिनिधी
तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी जोरदार टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Chief Spokesperson Keshav Upadhyay) यांनी शुक्रवारी येथे केली. आता तरी मुख्यमंत्र्यांनी मलिक यांची हकालपट्टी करून महाराष्ट्राचा अपमान थांबवावा, असेही ते म्हणाले.

जमीन खरेदीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारावरून सक्तवसुली संचालयाने मलिक यांना अटक केली असून काल, गुरुवारी त्यांच्याविरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. या पार्श्वभूमी आज पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलताना उपाध्ये यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बेनामी मालमत्तांच्या व्यवहारातून गोळा केलेला पैसा दाऊदच्या दहशतवादी कारवायांना (Terrorist Action) पुरविण्याचा आरोप असलेल्या मलिक यांची तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून नवा विक्रम केला आहे. खरे तर मलिक यांना अटक झाल्या झाल्या त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती. एरवी महाराष्ट्राच्या अस्मितेची भाषा वारंवार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Blast) आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या मलिक यांची पाठराखण करताना महाराष्ट्राचा अपमान होतो आहे, याची जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावणाऱ्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिले असून नवाब मलिक यांना तर त्यांनी चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रकही देऊन टाकले होते. शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील सचिन वाझे हा काही लादेन नाही, अशा शब्दांत त्याची प्रशंसाही केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर चाल करून जाणाऱ्यांच्या सत्कारास प्रोत्साहन देऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनोवृत्तीचे दर्शन महाराष्ट्रास घडविले होते. सातत्याने आपली खुर्ची जपण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, असेही उपाध्ये म्हणाले.