By चैतन्य गायकवाड |
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajyasabha) ६ जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेत आहे. येत्या १० जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यात कोण बाजी मारणार, हे १० जून रोजी कळेलच! त्यातच आता विधानपरिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा सुरु आहे. येत्या 20 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची (candidates) घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) आपले पाच उमेदवार निश्चित केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (Uma Khapare), माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde), भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय (Shreekant Bhartiy) यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. या नावांबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पंकजा मुंडे यांना डावलले.. दरम्यान, ओबीसी नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाने डच्चू दिला आहे. यंदा विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता होती. तशी मागणी देखील कार्यकर्त्यांकडून होत होती. मात्र, आज पक्षाने पाच जणांची यादी जाहीर करून पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे. भाजपने जाहीर केलेल्या या यादीत अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे आणि पंकजा मुंडे या दोन ओबीसी नेत्यांमध्ये राम शिंदे यांना संधी देऊन पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागल्याचे दिसून येत आहे.
कोण आहे उमा खापरे .? उमा खापरे या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा असून त्यांनी महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह संघटनेतील विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन टर्म नगरसेविका (corporater) होत्या. त्यांनी २००१-०२ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpari Chinchavad Municipal Corporation) विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) पद देखील भूषवले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड झाली होती.
दरम्यान, 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या या १० जागांसाठी अर्ज भरण्यासाठी उद्या (दि. ९) अंतिम तारीख आहे.