आदित्य ठाकरेंनी बांधलेला पूल गेला वाहून; पुन्हा महिलांची कसरत सुरु

आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वीच शेंद्री पाडा येथील तास नदीवर उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा भरपावसास लाकडी बल्ल्यांवरून पाण्याचे हंडे घेऊन जाण्याची कसरत करावी लागत आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा परिसरात पाणीटंचाईंचे भीषण वास्तव समोर आले होते. महिलांना पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण फिरावे लागते, त्यातही जे पाणी भेटत ते पिण्यायोग्य नसते.


अश्यातच त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकडी बल्ल्यावरून महिलांचा हांडे घेऊन जातानाचा जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ थेट तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचला होता. त्यांनी या व्हिडिओची दखल घेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटनासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पोहोचले होते.

दरम्यान मागील 10 दिवसात नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुक्यात प्रचंड मुसळधार पाऊस सुरु होता. अनेक ठिकाणी पूर आले, नदी नाले दुथड्या भरून वाहत होते. शेंद्री पाडा येथील तास नदीला देखील प्रचंड पूर आला होता. या भीषण पुरात नदीवर बांधलेला हा लोखंडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा जीवघेणी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आदित्य ठाकरे यांनी युवासेनाच्या माध्यमातून तास नदी काठावर लोखंडी पूल बसविण्यात आला होता. त्यामुळे तेथील महिलांचा जीवघेणा प्रवास थांबला होता, पण जुलै पासून सुरु झालेला मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला त्यात तास नदीने देखिल रौद्ररूप धारण केले होते, त्या पाण्याच्या वेगात नुकताच बांधलेला लोखंडी पूल टिकू शकला नाही, आणि तो पूल सरसकट वाहून गेला त्यामुळे येथील महिलांना पुन्हा लाकडी बल्ल्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

पूल उभारत असताना 30 फुटाहून अधिक उंचीवर पूल बसविण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आता पावसाळयात हा पूल चक्क वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या नशिबी जीवघेणी कसरत करणे आले आहे.