नाशिक : शहरात दोन ठिकाणी घर फोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी या चोरीतून तब्बल १ लाख २२ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केला आहे. यातील एक घटना आडगाव परिसरातील असून दुसरी घटना नाशिकरोड परिसरातील आहे. या सलग चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक मध्ये चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना २० जुलै रोजी निवृत्ती नगर, आडगाव शिवार येथे घडली,’ चोरट्यांनी ईश्वर जाधव यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडले व घरात प्रवेश केला, बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले व दोन तोळ्यांचे मणी मंगळसूत्र व ५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी ईश्वर जाधव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे हे करत आहेत.
दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे. ही घटना १८ जुलै रोजी घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेश गवारे यांच्या घराशेजारील भिंतीवरून उजेश गवारे यांच्या घराच्या गॅलरीत चोरट्यांनी प्रवेश केला व बेडरूमच्या खिडकीतून दरवाजाची आतील कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. व बेडरूम मधील कपाटातून तब्बल ६७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. हा चोरीचा प्रकार घर मालक उजेश गवारे यांना कळताच त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक आर. ए. शिंदे हे करत आहेत.
शहरात सतत अश्या घर-फोड्या,चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.