राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला मात्र नाशिकच्या ‘या’ शाळेत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच !

महाराष्ट्र राज्याची मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. मात्र नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड येथील शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील शालेय मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रा. खालकर प्रशांत उत्तम यांचे संकल्पनेतून गुप्त मतदान करून घेण्यात आली. बँलेट पेपर पद्धतीने मतदान करून शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं. राज्यभराला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली आहे, तो तर होईना. मात्र, सराड येथील आश्रम शाळेचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यामुळे या शालेय मंत्रिमंडळ विस्ताराची चांगलीच चर्चा होतेय.

भारत हा जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही असलेला प्रजासत्ताक देश आहे. आपण गावापासून ते देशापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया राबवत असतो. अगदी अशाच पद्धतीची निवडणूक प्रक्रिया या शाळेत शालेय मंत्रिमंडळ प्रस्थापित करण्यासाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या पदांसाठी शालेय विद्यार्थी रिंगणात उभे होते. यावेळी निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये उत्साह होता. तसेच मतदान करणाऱ्या विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षकही उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले होते.

यावेळी शिक्षक निवडणुक आधिकारी म्हणून प्रा.खालकर, प्रा. राऊत एच एम, प्रा. कदम एस पी, प्रा खैरनार व्ही एच, प्रा डोंगरे एस एन, प्रा निकुळे ए एस, बोरसे एस डी, चव्हाण जि जि, राठोड विकास , केशव बागूल, श्रीम गवळी भाग्यश्री, चव्हाण चारूशिला, महाले प्रतिभा, कनोज उज्वला यांनी बघितले तसेच निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने कामकाज बघितलं. नियंत्रण अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक कावळे बी के यांनी काम बघून मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडली.