मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे रात्रीचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, दिल्ली येथे रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ७.३० च्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना होतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतक्या तातडीने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीकडे का रवाना होताय या चर्चेला उधान आले आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत ५ वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेले आहेत. राज्यात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान होऊन २५ दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामागे विरोधक केंद्र सरकारला जबाबदार धरत आहेत. दिल्लीच्या ग्रीन सिग्नलशिवाय महाराष्ट्रात कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. सत्तेत आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या तीन बैठका घेतल्या असून त्यात घेतलेल्या बहुतांश निर्णयांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची छाप दिसत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील सरकार आता दिल्लीतून चालणार आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतोय.
तसेच एकनाथ शिंदे यांना दिल्लीला हजार वेळा जावे लागेल असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणले आहे. ते म्हणाले पुढील अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव निधीसाठी तसेच रखडलेल्या विकास कामांच्या निधीसाठी शिंदेंना वारंवार दिल्लीला जावे लागत आहे. एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचा राजकीय अर्थ काढू नये.
शिंदेंच्या मोदी-शहाच्या भेटीचा मविआने राजकीय अर्थ काढला आहे पण तसे नाहीये एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्यामागे राज्यातील विकासकामांना केंद्राकडुन निधी उपलब्ध व्हावा हे कारण आहे असेही ते म्हणाले.
त्यामुळे आज दिल्लीतील बैठकीत काय चर्चा होणार तसेच मंत्रिमंडळ स्थापनेची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.