नाशिक : विध्यार्थ्यांच्या सक्षम वाढीसाठी उपयुक्त असा हा उपक्रम देशातील पहिला उपक्रम असून त्याला राजाश्रय लाभणे आवश्यक आहे. केवळ बक्षिसांसाठी हा करियर कट्टा नसून विध्यार्थ्यांना कोविडच्या मानसिकतेतून बाहेर काढून त्यांना सकारात्मक करणे ही जबाबदारी सर्व प्राचार्य व शिक्षकांची आहे. हा कट्टा सक्षम कसा होईल याकडे सर्व संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पुण्यातील टेक्निकल अकादमीची इमारत करियर कट्टाकरिता देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१-२०२२ या वर्षातील ‘करियर कट्टा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सपकाळ नॉलेज हब येथे पार पडला. यावेळी उदय सामंत बोलत होते.
सपकाळ नॉलेज हब चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्रातल्या या करियर कट्ट्याला सन्मानजनक दर्जा प्राप्त करून देण्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी पालक, संस्थाचालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय साधला जाईल. तसेच विद्यापीठ परीक्षांचा होणारा घोळ कमी करून विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी उदय सामंत यांच्याकडे केली. यावर उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी उदय सामंत यांच्या हस्ते ‘करियर कट्टा’ राज्यस्तरीय महाविद्यालयीन विभागीय महाविद्यालय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट विभागीय समन्वयक, उत्कृष्ट जिल्हा समन्वयक, उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक अशी पारितोषिके विजेत्यांना देण्यात आली. सपकाळ नॉलेज हब च्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला विभागीय तृतीय पुरस्कार देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे, व्हाईस केअर ठाणे संचालक डॉ. सोनाली लोहार, सहसंचालक तंत्रशिक्षण विभाग डी. पी. नाठे, सपकाळ नॉलेज हब चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ, उपाध्यक्षा कल्याणी सपकाळ, प्राचार्य डॉ. साहेबराव बागल आणि जिल्हा तंत्रशिक्षण विभाग समन्वयक प्रा. सीमा बाजी आदी उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी उपस्थित होते.