नाशिक : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिकमध्ये देखील स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. वणी येथील शिर्डी सुरत महामार्गावर स्वाभिमानी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहे.
घसरलेले कांद्याचे दर, नाशिक जिल्हा बँकेचे वतीने शेतकऱ्यांवर होत असलेली कारवाई यासह विविध प्रश्नांवर स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. गळ्यात कांद्याची माळ आणि जिल्हा बँकेकडून आलेले नोटिसा घालून अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या राज्यव्यापी आंदोलनाची हाक आधीच दिली होती. त्यानुसार हे आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानी शेकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी या राज्यव्यापी आंदोलनाची माहिती दिली होती. दरम्यान आज त्यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.
प्रलंबित असलेल्या अनुदानासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे .या प्रश्नांकडे मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्येच सत्ताधारी व्यस्त दिसताय. प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी लक्ष देत नाही. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्न करत नाही .या सगळ्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरणार आहे.’ अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली होती.
थकित वीज बिलापोटी वीज कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडले तर शेतकऱ्यांचे पीकं करपून जातील व तो उध्वस्त होईल म्हणून हे विजेचे कनेक्शन तोडू नये तसेच कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ ३१ मार्चपर्यंत देऊन ५० टक्के पेक्षा कमी बील घेऊन वीजबिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. तसेच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सबसिडी देऊन रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित करायला हव्या. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा साठी तक्रारी नोंदवल्या आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याचे आदेश द्यावेत. बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी. सोयाबीन ,कपाशी, कांदा, द्राक्ष यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहे. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्वव्रत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.