हॉटेल, रेस्टॉरंटकडून घेतल्या जाणाऱ्या सेवाशुल्क संदर्भात मोठा निर्णय

By चैतन्य गायकवाड

केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणाने (Central Consumer Rights Protection Authority) हॉटेल आणि रेस्टॉरंटकडून केल्या जाणाऱ्या सेवाशुल्क (service charge) वसुली संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणानुसार कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल, त्यांच्याकडून वसुली करू शकत नाही. त्यामुळे आता हॉटेल आणि रेस्टॉरंट यापुढे ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत. याबाबतच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अनुचित व्यापार पद्धती व सेवा शुल्क आकारणी संदर्भात ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.

जर एखाद्या ग्राहकाकडून सेवाशुल्क वसूल करण्यात आल्यास, त्याची तक्रार ग्राहक आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे. नियमानुसार सेवा शुल्क देणे किंवा न देणे हे ग्राहकांच्या निर्णयावर अवलंबून असून हॉटेल आणि रेस्टॉरंट त्यांना सेवा शुल्क देण्यासाठी सक्ती करू शकत नाही, असं केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणाने म्हटलं आहे.

केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षणाच्या या निर्णयामुळे यापुढे कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट जेवण बिलामध्ये सेवा शुल्क जोडून आणि एकूण रकमेवर जीएसटी आकारून शुल्क आकारू शकत नाही, असेही सीसीपीएने म्हटले आहे. तसेच एखाद्या घटनेत एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटने याचे उल्लंघन करून सेवाशुल्क आकारले, तर ग्राहक ते बिलाच्या रकमेतून काढून टाकण्याची विनंती करू शकतात. तसा हक्क ग्राहकाला आहे असे देखील अधोरेखित केले आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट करून करण्यात येणाऱ्या सेवाशुल्कावरून गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती सेवा शुल्कावरून सुरू झालेल्या वादांमुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सीसीपीएने आता हॉटेल आणि रेस्टॉरंटकडून वसूल करण्यात येणारे सेवाशुल्क बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत सीसीपीएने मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.

ग्राहकांनो, अशी करा तक्रार…
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन १९१५ वर कॉल करून किंवा ॲपद्वारे देखील तक्रारी केल्या जाऊ शकतात. तसेच ग्राहक आयोगाकडे तक्रार केली जाऊ शकते. तसेच याबाबत ग्राहक जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करू शकतात. ग्राहकांना तक्रार करण्यासाठी सीसीपीएने आपला ईमेल देखील जारी केला आहे. com-ccpa@nic.in या ईमेलवर ग्राहकांना तक्रार करता येईल.