नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमध्ये आयटी पार्कला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून नाशिक महापालिका आडगाव शिवारात दीड हजार एकरावर हा आयटी पार्क उभारणार असल्याचे सांगितले जात आहे.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी नुकतीच नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर या आयटी पार्कचा मार्ग मोकळा झाला असून आता नाशकातील तरुणांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई-पुणे नंतर नाशिकमध्ये सुद्धा आयटी हब होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारकडून आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी वीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
नाशिकच्या आडगाव परिसरात अंदाजे दीड हजार एकर जागेवर हा आयटी हब उभारला जाणार असून येत्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौरांनी दिली आहे.
या आयटी पार्कमुळे यावर आधारित असलेल्या लोकांना, नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सोबतच ज्या मुलांना आयटी हबसाठी मुंबई, पुणे, बंगलोरला जावं लागत होते. त्यांच्यासाठी हा आयटी हब म्हणजे स्वतः चालून आलेली संधी ठरणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार आणि नाशिकच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.