केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवी नियमावली केली जारी!

By चैतन्य गायकवाड

नवी दिल्ली: देशभरातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी असून, केंद्र सरकारने (central government) ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (driving licence) नवीन नियमावली जारी केली आहे. गेल्या वर्षापूर्वी देशभरात नवीन व सुधारित मोटार वाहन नियम लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचा थेट परिणाम लायसन्सशिवाय गाडी चालवणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांत बदल केला होता. आता पुन्हा या नियमांमध्ये नव्याने बदल करण्यात आले आहे. त्यामुळे जर तु्म्ही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या तयारीत असाल, तर त्यासंदर्भातील सर्व नियम माहिती करून घ्या.

काय आहे नवीन नियमावली?

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्सविना गाडी चालवताना पकडला गेला, तर त्याला ५ हजार रुपयांचा दंड (fine) भरावा लागणार आहे. याअगोदर ही दंडाची रक्कम कमी होती.

जिल्ह्याबाहेर ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही

नवीन नियमावलीनुसार आता वाहनधारकांना त्यांच्या आधार कार्डवर (adhar card) नोंद असलेल्या जिल्ह्याच्या बाहेर ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही. त्यामुळे आता जे लोक स्थलांतरित किंवा प्रवासासाठी इतर जिल्ह्यांत असतात, त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी त्यांच्या मूळ जिल्ह्यातच जावे लागणार आहे.

चाचणी करणे बंधनकारक

वाहनधारकाच्या आधार कार्डवर ज्या जिल्ह्याचा पत्ता आहे, त्याच जिल्ह्यात जाऊन त्यांना कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी बायोमेट्रिक चाचणी (biometric test) द्यावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस टेस्ट (faceless test) असल्याने, केंद्र सरकारने नियम बदलले असल्याचे सांगितलं जात आहे.

त्याचबरोबर ज्या वाहनधारकांनी फेसलेस चाचणीसाठी नोंद केली आहे, त्यांच्या फेसलेस चाचणीसाठी आधार कार्डवरूनच पत्त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आता यापुढे वाहनधारकाने ज्या जिल्ह्यात आधार कार्डची नोंदणी केलेली आहे, त्यांना कायमस्वरुपी ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी संबंधित नोंद असलेल्या जिल्ह्यातच जावे लागणार आहे.