पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. नाशिक ( संभाजीनगर )औरंगाबाद नंतर आता एकनाथ शिंदे पुणे दौरा करणार असून या दरम्यानच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पुणे दौरा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात माजी आमदार विजय शिवतारे यांच्या सासवड मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्याबरोबरच संध्याकाळी सात वाजता पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे भेट देणार आहेत त्याच वेळेस आदित्य ठाकरे हे कात्रज मध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे आमने- सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या स्वागताची पुण्यात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात भरगच्च कार्यक्रम आहे. तसेच आदित्य ठाकरे हे देखील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह दिसत आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते उत्साहात येऊन घोषणाबाजी करू शकतात आणि त्यावरून दोनही गट आमने- सामने येऊ शकतात त्यामुळे पोलिसांकडून याची खबरदारी घेण्यात आली आहे .
शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने शिवसेनेत आता दोन गट तयार झाले आहेत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळत असला तरी आजच्या शिंदे आणि ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पोलीस प्रशासनाकडून हे दोन्ही नेते आमने सामने न येण्याची खबरदारी घेतली गेली असली तरी देखील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला रोष दिसून येत आहे त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्या दौऱ्याने कार्यकर्ते आम्ही सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रा, सभेंमधून, मेळाव्यातून शिंदे गटातील आमदारांना गद्दार बंडखोर बोलून निशाणा साधत आहे . असे असताना आज पुण्यात मुख्यमंत्री ठाकरे हे असल्याने आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी काय बोलतात किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.