By चैतन्य गायकवाड
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक मांडण्यात आला. या विश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते पडली. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर या ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदरांची अभिनंदनपर भाषणं झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील कर कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आणि रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले की, “हिरकणी गाव वाचवण्यासाठी शासानाच्या माध्यमातून २१ कोटींचा निधी देणार असल्याची मी घोषणा करतो. याचबरोबर, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्यावर पंतप्रधानांनी केंद्रीय कर कमी केला होता. पंतप्रधानांनी विनंती केली होती की सर्व राज्यांनी व्हॅट कमी करावा. त्यानुसार इतर राज्यांनी देखील व्हॅट कमी केला होता. परंतु महाराष्ट्राने पाच पैसे देखील कमी केले नव्हते. तर आता आमचे युतीचे सरकार कर कमी करण्यासाठी लवकर निर्णय घेणार आहे.”
तसेच, “या राज्यातील सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे बळीराजा याच्या बांधावर सगळेच लोक जाऊन, त्याची विचारपूस करतात. तर या शेतकऱ्याच्या जीवनात देखील सुखाचे क्षण यावेत म्हणून त्यासाठी राज्य सरकार एवढं करेन, की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षांचं सगळ्यांचं योगदान आणि सहकार्य आम्हाला लागेल. सत्ताधारी व विरोधी पक्षाने हातात हात घालून काम करूयात.” असं देखील मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलं.