एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहे. त्यांच्या दौरा उत्तर महाराष्ट्रातून म्हणजेच नाशिक येथून सुरु होणार असून ते आज रात्री (२९) नाशिकमार्गे मालेगावमध्ये येणार आहेत, व उद्या सकाळी मालेगाव येथून आपल्या दौऱ्याला सुरवात करणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री हे नाशिक मुख्यालय सोडून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच मालेगाव मध्ये विविध विकासकामांचा आढावा घेणार आहे. दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे विकासकामांचा आढावा घेणार असून, नाशिक जिल्ह्यासाठी शिंदे काय भरीव तरतूद करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआच्या काळातील जिल्ह्यातील जवळपास ६०० कोटींच्या कामांना मुख्यमंत्री शिंदेनी ब्रेक लावला होता. आणि या आढावा बैठकीत नाशिक ला काही विशेष पॅकेजची घोषणा करतील का? असाही प्रश्न उपस्थित होतो.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी लगेच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे घोषित केले होते. राज्यातील परिस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना सतत दिल्ली येथे जावे लागत होते. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार पुढील दोन तीन दिवसांत होणार असल्याचेही स्पष्ट केले, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे. आज सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री शिंदे मुंबई शासकीय निवासस्थानावरून नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होतील, रात्री १० वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे मालेगाव शासकीय विश्रामगृहावर प्रस्थान करतील, तसेच उद्या सकाळी (३०) पासून मालेगाव येथून महाराष्ट्र दौरा सुरु करतील.
मुख्यमंत्री सकाळी सुरुवातीला मालेगावमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेतील त्यानंतर सभा घेणार आहेत. मालेगाव चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी, मालेगावला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आमदार दादा भुसे यांनी मागील दोन्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच फडणवीस आणि ठाकरे यांच्याकडे मालेगावला स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याची मागणी केली होती, तसेच दादा भुसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तीच पहिला मागणी केली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या दौऱ्यात नाशिक विभागीय कार्यालयापेक्षा मालेगावमध्ये बैठक घेण्याला महत्त्व दिले.
त्यामुळे स्वतंत्र मालेगाव जिल्ह्याच्या निर्णयला मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक असण्याच्या चर्चा आहेत आणि मालेगाव ला स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याच्या विषयावर चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे मनमाड येथे सुहास कांदे यांच्या कार्यालयाला देखील भेट घेणार आहेत व विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभांचे देखिल आयोजन केले आहे. मालेगाव मनमाड झाल्यानंतर पुढे मुख्यमंत्री शिंदे औरंगाबादच्या दौऱ्याला प्रस्थान करतील.