नाशिक जिल्ह्यातील वणीच्या (Wani) सप्तशृंगगड येथे ढगफुटी (Cloudbrust) सारखा प्रकार घडला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मंदिराच्या वरील बाजूने अचानक वाहून आलेल्या पावसाने संपूर्ण उतरती पायरी मार्गावर पुरासारखी परिस्थिती तयार झाल्याचं दिसून येत आहे. या पाण्याबरोबर मोठ्या संख्येने दगड, माती आणि झाडे देखील वाहून आली आहे. प्रसंगी त्यामार्गे मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांना सुखरूपपणे विश्वस्त संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने खाली आणून त्यांचे योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. जवळपास ७ भाविकांना सदर घटने दरम्यान किरकोळ ईजा झाली असून त्यावर योग्य ते उपचार धर्मार्थ व ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहेत.
घटनास्थळी ट्रस्ट व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक, सुरक्षा अधिकारी आदी स्वतः उपस्थित होते. ट्रस्टच्या मार्फत १२ महिने कार्यरत असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम आणि कमांडो फोर्सने विशेष परिश्रम घेवून भाविकांची सुरक्षित ठिकाणी हालचाल केली आहे.
नाशिक जिल्ह्याला (Nashik district) पुढील काही दिवस हवामान खात्याने अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट (Red alert) देखील देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने देवू केलेल्या सूचनांचा विचार करता भाविकांनी अतिवृष्टी सदृश परिस्थितीत योग्य ती खबरदारी घ्यावी. असं आवाहन सप्तशृंगी ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.