By चैतन्य गायकवाड |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) घोषणा केलेली लष्कर भरतीची नवी ‘अग्निपथ योजना’ (Agnipath Yojna) यावरून सध्या देशभरात गोंधळाचे वातावरण सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये या योजनेचा विरोध सुरु आहे. या योजनेच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलनदेखील सुरू केले आहे. लष्कर भरतीच्या या नवीन ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभरातील तरुण निदर्शने करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), राजस्थान (Rajsthan), हरियाणा (Hariyana) या राज्यांमधून या आंदोलनाचे लोण आता देशातील इतर भागांत देखील पसरताना दिसत आहे. दरम्यान, या योजनेच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने आज दिल्लीत (Delhi) जंतरमंतरवर (JantarMantar) सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.
लष्कर भरतीची नवी ‘अग्निपथ’ योजना (Agnipath Scheme), सध्या नॅशनल हेराल्ड (National Herald) या प्रकरणात सुरु असलेली राहुल गांधींची ईडी चौकशी तसेच खासदारांवर सुरु असलेले कथित हल्ले या गोष्टींच्या विरोधात काँग्रेसचे दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgad CM Bhupesh Baghel), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) आणि इतर काँग्रेस नेते तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
राहुल गांधी यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन… दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कार्यकर्त्यांना रविवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, देशातील परिस्थितीने आपण सर्व चिंतेत आहोत. देशातील तरुणांचे मन दुखी आहे. देशातील तरुण रस्त्यावर आंदोलन करत आहेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे आपला वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले होते.
दरम्यान, केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच सैन्य भरती याच योजनेतून होणार असल्याचे देखील जाहीर केले. या योजनेला तरुणांचा होणारा विरोध बघता केंद्र सरकारने या योजनेत सुधारणा देखील केली आहे. वयोमर्यादा वाढविणे तसेच या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Foeces) आणि आसाम रायफल्सच्या ( Assam Riffles) भरतीमध्ये १० टक्के आरक्षण (10 % reservation) देण्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.