नाशिक: सप्तश्रृंगी माता मंदिर मूर्ती संवर्धन देखभाल करण्यासाठी ४५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अचानक देवीच्या मूर्ती संवर्धनाची गरज का भासली, कुणाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात येत आहे अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज यांच्याकडून मंदिर प्रशासनावर करण्यात आला. ‘आम्हाला विश्वासात न घेता काम सुरू केल्यास आम्ही आत्मदहन करून घेऊ’, असा इशारा देखील यावेळी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज यांनी दिला आहे. तसेच सप्तश्रृंगी मंदिरातील मुर्तीला इजा झाली असावी असा संशय त्रंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे न देता काम सुरू केल्यास महंतासोबत आंदोलन करू असेही त्या म्हणाल्या.
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली होती. पण आता हे कामकाज सुरू व्हायच्या आधीच वादात सापडले आहे. महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज( आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा) यांनी या कामावर आक्षेप घेतला आहे. आणि त्यांनी यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. ‘देवीच्या मूर्तीची संवर्धन करण्याची गरज का भासली,कुणाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात येत आहे याची देखील माहिती अद्याप उपलब्ध नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तसेच मंदिरात नेमके कोणते काम केले जाणार आहेत याबाबत माहिती मिळावी, हे काम करताना मूळ मूर्तीला धक्का लागणार नाही याची हमी आम्हाला देण्यात यावी, अश्या मागण्याही महंतांनी केल्या आहेत.
सप्तश्रृंगी मंदिरातील मुर्तीला इजा झाली असावी म्हणूनच कोणालाही विश्वासात न घेता मंदिर बंद ठेवण्याचा असा तडक निर्णय घेण्यात आला असावा असा संशय त्रंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी व्यक्त केला. त्यामुळे मूर्ती संवर्धानाचे काम सुरु होण्यापूर्वीच ते वादाच्या घेऱ्यात अडकले आहे.