धर्मांतर कर नाहीतर ‘७० तुकडे’ करेल लिव्ह इन संबंधातून तरुणीला धमकी

धुळे : दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशाला थरारून सोडले आहे. अद्यापही ती घटना कोणी विसरू शकलं नाहीये. अशात श्रद्धाचे ३५ तुकडे केले तुझे ७० तुकडे करू अशी धमकी लिव्ह इन संबंधातील तरुणाने एका तरुणीला दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘तू आमच्या विरोधात गेली तर तुझे ७० तुकडे करेल अशी धमकी लग्नाशिवाय एकत्र राहत असलेल्या तरुणाने दिली असल्याची फिर्याद धुळे येथे एका २४ वर्षे तरुणीने दिली आहे.

आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावलं. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि या तरुणाच्या पित्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले अशी देखील तक्रार पीडितेने दाखल केली आहे. मध्यरात्री दाखल झालेल्या या तक्रारीनुसार अर्शद सलीम मलिक या तरुणाने लिविन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला २९ नोव्हेंबर रोजी अशी धमकी दिली होती.

जुलै २०२१ पासून ते दोघं एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्याआधी ४ एप्रिल २०१६ रोजी तिचा पहिला विवाह झाला होता. २०१७ मध्ये तिला मुलगा झाला आणि २०१९ मध्ये तिच्या पतीचे रस्ता अपघातात निधन झाले होते. त्यानंतर तिची भेट एका अकॅडमीत हर्षद माळी या तरुणाशी झाली. त्यांने तिच्यावर अत्याचार करत त्याची चित्रफीत बनवून तिला धमकावलं. एकत्र राहण्यास दबाव आणला. त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रिलेशनशिप बाबत प्रतिज्ञापत्र तयार केलं. ते करताना या तरुणाचं नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचं तिला समजलं. अर्शदने तिला उस्मानाबाद मध्ये नेलं. त्या ठिकाणी त्याच्या पित्याने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

चार महिन्यांनी तिला धुळे शहरात पुन्हा आणण्यात आलं. २६ ऑगस्ट २०२२ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही या तरुणाच्या पित्याकडून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार होतच होते. दरम्यान अर्शदने तिचे धर्मांतर करून घेतले आणि तिच्या पाच वर्षाच्या पहिल्या मुलाचे देखील धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तरुणीला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली आणि तिचे फक्त ३५ तुकडे केले तुझे आम्ही ७० तुकडे करू अशा शब्दात धमकावले, असं देखील पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.