देशात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ८ हजारांपेक्षा जास्त वाढ..

By चैतन्य गायकवाड |

नवी दिल्ली : देशात नवीन कोरोना रुग्णांच्या (new corona patients in country) संख्येत गेल्या २४ तासांत तब्बल ८ हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८३२९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या ७ दिवसांची कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी पाहिल्यास, नवीन रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढल्याचे दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात शनिवारी (दि. ४ जून) देशभरात नवीन ४२७० कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. ७ दिवसांनंतर काल दिवसभरात नवीन ८३२९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी तब्बल दुप्पटीने (double) वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ८३२९ नवीन कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक म्हणजे ३०८१ रुग्णांची नोंद आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter account) ही माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ४२१६ कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याआधी गुरुवारी (दि. ९ जून) देशभरात ७५८४ नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून देशातील आजपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर देशात सध्या ४०,३७० उपचारार्थी कोरोना रुग्ण आहेत. देशात सध्या कोरोना रिकव्हरी दर (recovery rate) ९८.६९ टक्के इतका आहे. तर सक्रीय रुग्णांचा दर (active cases rate) ०.०९ टक्के इतका आहे. देशात दररोजचा सकारात्मकता दर (positivity rate) २.४१ टक्के इतका आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ३,४४,९९४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात ३०८१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद... कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होण्यात महाराष्ट्र सलग दुसऱ्या दिवशीही अव्वल स्थानी आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ३०८१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील हा कोरोना रुग्ण वाढीचा गेल्या चार महिन्यांतील उच्चांक आहे. तसेच गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १३२३ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर विशेष म्हणजे एकही कोरोना रुग्ण मृत्यूची नोंद नाही. महाराष्ट्रातल्या या नवीन कोरोना रुग्णसंख्येत एकट्या मुंबईत १९५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे १३,३२९ सक्रीय रुग्ण आहेत.