ताहाराबाद ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार, सरपंचांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) ताहाराबाद ग्रामपंचायत (Taharabad Grampanchayat) झालेल्या आर्थिक गैरव्यवहार (Money Fraud) प्रकरणी अखेर जायखेडा पोलिसांनी गुन्हा (Jaykheda Police) दाखल केला आहे. ताहाराबाद च्या सरपंच शीतल योगेश नंदन, तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील पांडुरंग ठोके व ग्रामीण पाणीपुरवठा मालेगाव उपविभागाचे शाखा अभियंता विनोद नारायण पाटकर यांच्या विरोधात बागलाण पंचायत समितीचे (Baglan Panchayat Samiti) गटविकास अधिकारी पांडुरंग घुले यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

जायखेडा पोलिसांनी संशयितांविरोधात शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातील १४ लाख ६३ हजार ६५१ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार याचा ठपका ठेवला आहे. तहाराबाद ग्रामपंचायती १४ व १५ व्या वित्त आयोगातील कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत विरोधी गटाने शिवसेना (Shivsena) तालुका प्रमुख सुभाष नंदन यांच्या नेतृत्वात वर्षभर आंदोलन व उपोषण करून दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली होती. मात्र शासकीय यंत्रणांकडून सुभाष नंदन यांना तारीख पे तारीख मिळण्यापलीकडे काही होत नव्हते.

शासन स्तरावर नेमण्यात आलेल्या चौकशी समित्यांनी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अहवाल सादर करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सुभाष नंदन यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी जायखेडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने सोपवलेल्या १४ लाख ६३ हजार ६५१ रुपयांचा तिन्ही संशयितांनी संगनमत करून बनावट बिले (Fake Bills) सादर करून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सरपंच शीतल नंदन, ग्रामसेवक स्वप्नील ठोके व मोजमाप पुस्तिकेत नोंद घेणारे शाखा अभियंता विनोद पाटकर यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय

ताहाराबाद येथे पाणी पुरवठा योजनेसाठी (Water Supply Scheme) स्विच रूम बांधणे व पंपिंग मशिनरी बसवण्यासाठी चे ०३ लाख १४ हजार ५१२ रुपये, १५ हजार लिटर पाण्याच्या टाकी साठी ०२ लाख ४७ हजार १८८ रुपये, पाईपलाईनसाठीचे ०६ लाख ५५ हजार १५१ रुपये तसेच ग्राम बालविकास केंद्राअंतर्गत साहित्यासाठी ९८ हजार पाचशे रुपये, गणवेश वाटप करण्याचे ९५ हजार पाचशे रुपये अशा रकमांचा या योजनांमध्ये गैरव्यवहार करण्यात आला आहे.