By चैतन्य गायकवाड |
इंग्लंड (Ingland) आणि नेदरलँड (Netherlands) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिला सामना ॲमस्टेलवेन येथील मैदानावर खेळवला गेला. या पहिल्याच एकदिवसीय (One day) सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी नेदरलँडच्या गोलंदाजांना धू धू धुतले! इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. या संघाचा ५०० धावांचा टप्पा अवघ्या २ धावांनी हुकला. या संघाने एकूण ४ बाद ४९८ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या (highest score) आहे. हा विक्रम करताना इंग्लंड संघाने अगोदरचा स्वतःचाच ४८१ धावांचा विक्रम मोडला. जोस बटलर (Jos Buttler), फिल सॉल्ट (Phil Salt) व डेवीड मलान (Dawid Malan) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. दुसऱ्या षटकात इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयला बाद केल्यामुळे नेदरलँड्सचे गोलंदाज आनंदात होते. परंतु फिल सॉल्ट व डेवीड मलान या जोडीने २२२ धावांची भागीदारी करून त्यांना गोलंदाजांना वठणीवर आणले. त्यानंतर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरचे वादळ घोंगावले. त्याने ४७ चेंडूंत शतक पूर्ण केले. एका एकदिवसीय सामन्यात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे.
इंग्लंडच्या तीन फलंदाजांची शतके… या सामन्यात इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली. सलामीवीर फिलिप सॉल्टने ९३ चेंडूत १२२ धावा फटकावल्या. डेव्हिड मलानने १०९ चेंडूत १२५ धावा केल्या. पण अजून महत्त्वाचा खेळ बाकी होता. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) ऑरेंज कॅप (Orange cap) पटकावणाऱ्या जोस बटलरने मैदानावर वादळ निर्माण केले. त्याने अवघ्या ४७ चेंडूत शतक झळकावले. जोस बटलरने ७० चेंडूत १४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद १६२ धावा केल्या. या सामन्यातील आणखी एक विक्रम म्हणजे एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक म्हणजे २६ षटकार (sixes) मारण्याचा विक्रम या संघाने केला. त्यांनी स्वतःचाच अगोदरचा २५ षटकारांचा विक्रम मोडला.
इंग्लंड संघाने मोडला स्वतःचाच विक्रम… इंग्लंड संघाने ४ बाद ४९८ धावा ठोकल्या. या संघाने स्वतःचाच अगोदरचा विक्रम मोडला. या अगोदर इंग्लंड संघाने २०१८ मध्ये नॉटिंगहॅममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australiya) ६ बाद ४८१ धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या देखील इंग्लंडच्याच नावावर आहे. २०१६ मध्ये नॉटिंगहॅममध्येच इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या. वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५० वर धावा करता आलेल्या नाहीत. सर्वोच्च धावसंख्येत चौथ्या क्रमांकावर श्रीलंका (Shrilanka)असून, या संघाने नेदरलँडविरुद्ध ९ बाद ४४३ धावा केल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (South Afrika) असून त्यांनी वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध २ बाद ४३९ धावा केल्या होत्या.