नाशिक । प्रतिनिधी
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरात आज धुळवडीचा उत्सव साजरा होत आहे. सर्वत्र आज धुळवडी निमित्त रंगांची उधळण असली तरी, नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. 300 वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम असून, आज येथे वीरांची मिरवणूक काढण्यात आली. धुळवडीनिमित्त आयोजित ही ऐतिहासिक दाजीबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
वीर नाचवण्याच्या परंपरेचा मान 300 वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे मान आहे. आज विनोद बेलगावकर यांना हा मान मिळाला. शहरातून निघणारा हा दाजीबा वीर नवसाला पावणारा असल्याचेही मानले जाते. त्यामुळे अनेक जणांची त्याच्यावर श्रद्धा आहे. आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देऊन नाचवतात. त्यामुळे बाळ निरोगी आणि सदृढ होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच वीरांच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात.
होळीनंतर धूळवडीला गोदाकाठी नाशिक शहरातील मानाच्या वीरांची वेगवेगळ्या देवदेवतांच्या पेहरावात सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यंदा ढोल ताशांच्या गजरात वीरांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जुन्या नाशिकमधील दाजीबा वीरांची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात होळीचा उत्साह शिगेला होता. दरम्यान आज धुळवडीनिमित्त वीरांची मिरवणूक काढण्यात आली. या वीराच्या मिरवणुकीत नाशिककर मोठ्या हौसेने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.