नाशकात दांडियातला वाद धारदार शस्त्रांपर्यंत ! युवकाला मारण्यासाठी टोळक्याची दह्शत

नाशिक : दांडिया खेळताना झालेल्या वादावरून एका युवकाला मारण्यासाठी २५ ते ३० जणांच्या टोळक्यानं हातात धारदार शस्त्र, तलवार, लाकडी दांडके घेऊन रस्त्याने येत शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजे दरम्यान राजरत्न नगर, लोकमान्य नगर येथे घडली. दरम्यान घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. जवळपास ३० जणांचे टोळके या युवकाच्या मागे लागलेले असताना या युवकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्यानंतर तो एका घरात जाऊन लपल्याने सुदैवानं त्याचा जीव वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून एका मागे एक घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमधील भीतीचे वातावरण कायम आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा दिवसांपूर्वी दत्तनगर भागात अशाच प्रकारे टोळक्यांचा हैदोस पाहायला मिळाला होता. २५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दगडफेक करत दहशत निर्माण केली होती. त्यानंतर याच ठिकाणी दुचाकी जाळपोळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाकाली चौक परिसरात दांडिया खेळत असताना शनिवारी रात्री काही लोकांमध्ये वाद झाला. दरम्यान झालेल्या वादावरून युवकाचा बदला घेण्यासाठी २५ ते ३० जणांची टोळके एकत्रित जमले. आपल्याला मारहाण करणार हे समजल्यानंतर युवकाने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळ काढला. यावेळी महाकाली चौकापासून ते राजरत्न नगर आणि लोकमान्य नगर पर्यंत चित्रपटातील सीनप्रमाणे युवकाचा पाठलाग करत, हातात धारदार शस्त्र, तलवार, दांडके घेऊन बारा जणांचे टोळके शिवीगाळ करत युवकाच्या मागे लागले. स्वतःचा जीव वाचवत युवक एका घरात लपला. युवक ज्या घरात लपला त्या व्यक्तीने गुंडांना निघून जा सांगितल्यानंतर गुंड या ठिकाणी निघून गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून रहिवाशांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे गुन्हेगारी घटनांसाठी चर्चेत असलेली अंबड पोलीस हद्द पुन्हा एकदा चर्चेत आली. या आधी देखील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरांचा बिनधास्त वावर, महिलांची छेडछाड, हाणामारी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, खून यासारखे प्रकरण समोर आले आहेत. दरम्यान आता ऐन सणासुदीच्या काळात अशी घटना घडल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासोबतच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.