नाशकात पुन्हा धोकादायक वाडा कोसळला..!

नाशिकमध्ये जोरदार पावसासह धोकादायक वाडे देखील कोसळत आहे. जुने नाशिक परिसरातील डिंगरअळी भागात धोकादायक वाडा कोसळण्याची घटना घडली आहे. जुने नाशिक परिसरातील मागील अनेक वर्षांपासून पडीक, धोकादायक झालेल्या आंबेडकर आणि जोशी वाड्याची भिंत अचानकपणे मध्यरात्रीच्या सुमारास ढासळली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. वाड्यात कोणीही वास्तव्यास नसल्यामुळे तसेच रात्री घटना घडल्यावर रस्त्यावरून देखील वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

नाशिक शहरात पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरींचा वर्षाव दिवसभर सुरूच असतो. काही वेळ विश्रांती घेत पावसाच्या सरींचे पुन्हा आगमन होतच राहते. अशात सतत सुरू असलेल्या या पावसामुळे जुन्या नाशकात वाडे ढासळण्याच्या घटना घडत आहेत. डिंगरअळीत वाडा ढासळल्याने माती विटांचा ढिगारा थेट रस्त्यावर येऊन पसरला होता. त्यानंतर घटनेची माहिती मिळवाल मनपाच्या बांधकाम खात्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ढिगारा बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला.

जुने नाशिक परिसरात वाड्यांची संख्या मोठी आहे. त्यात धोकादायक वाड्यांचा आकडाही मोठा. यामध्ये बहुतांश वाड्यांमध्ये कोणीही रहिवासी वास्तव्यास नाही तर काही वाड्यांमध्ये कुटुंब वास्तव्य करत आहेत. महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक वाड्यांच्या मालकांना, भाडेकरूंना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र दर पावसाळ्यात जुन्या नाशिकमध्ये वाडे कोसळण्याचा प्रश्न गंभीर आहे. याआधीही पावसाळ्यात वाडे कोसळल्याने जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

रविवारी सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू असल्यामुळे नागरिकांचा सुट्टीचा दिवस वाया गेला. सततच्या पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. तर जुने नाशिक परिसरात वाडा कोसळला आहे. त्यामुळे आता पाऊस पडणं कधी बंद होईल याचीच वाट नाशिककर पाहत आहे. शहरात गुरुवारपासून पावसाची हजेरी कायम आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या नाशिक परिसरात धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनभा प्रशासनाकडून धोकादायक वाड्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. तर महापालिका प्रशासनानं जुने नाशिकमधील १६ धोकादायक वाड्यांमधून रहिवाशांना स्थलांतरित करून घेत वाडे रिकामी केले आहे. पुढील दोन ते तीन दिवस तरी पावसाची मध्यम स्वरूपाची हजेरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज देखील अंशतः ढगाळ आकाश राहणार असून गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.