नाशिक शहरात आता डेंग्यू अळी आढळल्यास नागरिकांवर चक्क दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मलेरिया विभागाने आता डेंग्यूचे वाढते आकडे लक्षात घेता दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. घरांसह व्यावसायिक इमारती, सरकारी कार्यालय बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती आढळल्यास प्रतिस्पॉट दोनशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता डेंग्यू अळी आढळली तर दोनशे रुपये जागेवरच दंड होईल. डेंग्यू अळी नागरिकांकडून दंड वसूल होणार.

..आणि यामुळे डेंग्यू नियंत्रणात राहील असा दावा
महापालिकेने डेंग्यूबाबत कठोर धोरण स्वीकारली आहेत. सातत्याने वाढणारा डेंग्यूचा प्रभाव कमी व्हावा यासाठी महापालिकेने दंडाची मात्रा शोधून काढली आहे. गेल्या काही वर्षांपासून डेंग्यूचा सततचा त्रास लक्षात घेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांच्या घरात डेंग्यू अळीची उत्पत्ती आढळल्यास दोनशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दंड प्रति उत्पत्तिस्थळ आकारण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचनाही महापालिकेने काढली आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणात राहील, असा दावा करण्यात आला आहे.

प्रतिस्पाॅट दोनशे रुपये दंड
पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचं साम्राज्य निर्माण होतं. त्यानंतर डबके आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते. कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यात डेंग्यू चिकनगुनिया आणि अनेक साथीचे रोग डोके वर काढू लागतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात आजपर्यंत डेंगूंच्या ९८ रुग्णांची नोंद झाली तर जानेवारीपासून ते आतापर्यंत २७० डेंगू बाधित आढळले आहे. त्यामुळे हा कीटकजन्य रोग कुठेतरी डोकेदुखी ठरत आहे. घरोघरी सर्वेक्षण केल्यानंतर व्यवसाय ईमारती, सरकारी इमारती यामध्ये डेंग्यू अळ्या आढळल्या होत्या आणि त्यावेळी ५२५ जणांना नोटीसाही देण्यात आल्या होत्या. मात्र आता नोटीसा नसून डेंगूच्या अळ्या आढळल्यास थेट कारवाई होणार आहे. या कारवाईत स्पॉटवर डेंग्यूची अळी आढळल्यास दोनशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान महापालिकेचा हा निर्णय डेंग्यूला आळा घालण्यासाठी किती परिणामकारक ठरतो हे पहाणे महत्त्वाचे राहील.
डेंग्यूबद्दल थोडसं
जगामध्ये डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटीबंधात आढळून आलेला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे आढळून आला. डेंग्यू ताप व एडिस इजिप्टाय डास प्रामुख्याने जगातील शितोष्ण कटिबंधात पसरलेला आहे. सध्या २५ दशलक्ष लोक डेंग्यू संवेदनशील भागात वास्तव्य करतात. आजतागायत जागतिक आरोग्य संघटनेच्या ( डब्ल्यू. एच. ओ. ) सहा विभागात (युरोप व्यतिरिक्त ) डेंग्यूचा मोठया प्रमाणात उद्रेक आढळून आलेला आहे. डेंग्यू हा विषाणू पासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंग्यू, ताप, डेंग्यू रक्तस्त्रावीताप व डेंग्यू शॉक सिंड्रोमचे रुग्ण संपूर्ण जगात आढळून आलेले आहेत व त्यात सातत्याने वाढ होत आहे.