संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सैन्य भरतीबाबत मोठी घोषणा…

By चैतन्य गायकवाड |

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या तीनही सेना दलात तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यासाठी एक नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी याबाबत आज मोठी घोषणा केली आहे. भारतीय सैन्यात तरुणांनी दाखल व्हावे यासाठी ‘अग्निपथ’ (Agnipath) या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे तरुण केवळ ४ वर्ष्यांसाठी सैन्यदलात सेवा देऊ शकणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांसोबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या योजनेची माहिती दिली. केंद्र सरकारने नवीन टूर ऑफ ड्युटी (Tour Of Duty) व्यवस्थेची घोषणा केली आहे. त्याला ‘अग्निपथ’ असं नाव दिलं आहे. या नव्या योजनेत सैन्यदलात भरती होणाऱ्या युवकांना ‘अग्निवीर’ (Agniveer) या नावाने ओळखले जाणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गंत सैन्यदलात सैनिकांची भरती चार वर्षांपर्यंत होणार आहे. 

काय आहे ‘अग्निपथ योजना’… मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणांचे वय १७. ५ वर्ष ते २१ वर्ष आहे, ते या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेतून भरती झालेल्या तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर, उरलेल्या कालावधीत म्हणजे ३.५ वर्षे ते तरुण सैन्यात कर्तव्य बजावतील. तसेच नवीन ‘अग्निपथ’ योजनेत सुरुवातीला ३० हजार रुपये महिना पगार जवानांना मिळणार आहे. त्यानंतर पगार वाढून ४० हजार इतका होईल. मुख्य म्हणजे इतर कायमस्वरूपी सैनिकांप्रमाणे पुरस्कार, पदके आणि विमा संरक्षण देखील या योजनेत मिळणार आहे. सरकार या पगाराच्या ३० टक्के रक्कम ‘सेव्हिंग’ म्हणून ठेवेल आणि ती ‘सेवा निधी’ मध्ये जमा करेल. उर्वरित ७०% पगार खात्यात जमा केले जातील.

या ४ वर्ष पूर्ण केलेल्या जवानांपैकी केवळ २५ टक्के जववानांनाच कायमस्वरूपी सैन्यात भरती केली जाईल. या जवानांची गुणवत्ता आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारावर २५ टक्के जवानांना पुढे भरती केले जाईल. या योजनेत जे ७५ टक्के जवान बाहेर होतील, त्यांना सेवा निधी दिला जाईल. हा सेवा निधी १० ते १२ लाख इतका असणार आहे. यासोबतच या जवानांना ४८ लाख रुपयांचा विमा देखील मिळणार आहे. या चार वर्ष सेवा कालावधीत जवानाला अपंगत्व किंवा काही शारीरिक अक्षमता निर्माण झाल्यास, जवानाला एक वेळची आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.