सावधान..! गंगापूर धरणातून विसर्ग आणखी वाढवला, गोदाकाठच्या लोकांना हाय अलर्ट

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी असल्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्याप्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सकाळी ११ वाजता ५००० क्युसेकने विसर्ग करण्यात आला तर पावसाचा जोर अजूनही कायम असून हा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येत आहे. तर आता हा विसर्ग ७००० क्युसेक एवढा करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर राहिल्यास अजूनही विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येणार आहे. दरम्यान धरणातून हळूहळू विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे नदीला मोठा पूर येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याची आवाहन नाशिक मनपाच्या वतीने देण्यात आले आहे. इतक्या प्रचंड प्रमाणत विसर्ग करण्यात आला तर नदी रौद्र रूप धारण करेल त्यामुळे नाशिकारांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

यंदा पाऊस जरा जास्तच

यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असून ह्या हंगामात जवळपास आठ ते नऊ पूर आले आहेत. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने गंगापूर धरणातून देखील मोठ्याप्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून नाशकातील आठवडे बाजाराला देखील याचा मोठा फटका असत आहे. याने मोठी आर्थिक उलाढाल बंद झाली असून अनेकांना तोटे सहन करावे लागत आहे. तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना देखील फटका बसत आहे.

पावसाचा पॅटर्न चेंज

राज्यासहित नाशकातील पावसाचा पॅटर्न बदलला असून याचा मोठा फटका शेतकऱ्यासहित नागरिकांनाही बसत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला असून याचा पहिला तडाखा सिन्नर ला बसला. यात मोठ्याप्रमाणावर जीवितहानी आणि आर्थिक हानी झाली होती. नाशिक शहरात देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. त्यामुळे संपूर्ण शहर तुंबले होते संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच तीन जणांना या मुसाधार पावसाचा फटका बसला होता आणि त्यांना त्याचा जीवाला मुकावे लागले होते.