नाशकात तुरुंगाधिकाऱ्यांचीच कोठडीत रवानगी; कारागृहात कैद्यांकडून घ्यायचे…

नाशिक: मध्यवर्ती कारागृहातील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून यातील २ आरोपी तुरुंगाधिकाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावत दाेघांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली आहे. हे तुरुंग अधिकारी कैद्यांकडून बक्कळ पैश्यांची मागणी करत त्यांनी त्यांना पॅराेल मंजूर करण्यासह रेकाॅर्डवरील शिक्षा कमी करायचे, प्रकरणाने नाशिकसह राज्यात खळबळ उडाली होती. अखेर या तुरुंगाधिकाऱ्यांची कोठडीत रवानगी झाली आहे.


काय आहे प्रकरण?

२०१७ मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी संशयित श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे आणि वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तिघा कैद्यांना शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडले होते. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते, या चौकशीत दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तुरुंगाधिकारी सतीष गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार एप्रिल 2022 मध्ये नाशिक राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. शिक्षा भाेगणाऱ्या कैदी व त्यांच्या नातलगांकडून लाच घेऊन कैद्यांच्या शिक्षा कमी करुन त्यांना तात्पुरत्या स्वरुपात कागदाेपत्री खाडाखाेड करुन मुक्त किंवा शिक्षा कमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


आता कोठाडीत रवानगी

न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगाधिकारी संशयित आरोपी श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे नाशिकराेड पाेलिसांनी अटक केली. हे दाेघेही अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात गेले हाेते. मात्र,न्यायालयाने जामीन नाकारल्याने दाेघेही नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयाला शरण आले हाेते. त्यानंतर येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावत दाेघांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली आहे. तसेच या गुन्ह्यातील तिसऱ्या संशयित लिपिक सुरेश जयराम डबेराव अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.