‘बेळगावात येऊ नका, सुप्रीम कोर्टात लढू’, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुन्हा इशारा

Maharashtra-Karnataka Boundary : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात ‘आमच्यासाठी दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे, तुमच्या आक्षेपांवर वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. तेथे लढू. येथे येऊन राज्याची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवू नका’ असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे.

‘आम्ही आधीच मुख्य सचिवांद्वारे पत्र पाठवले आहे. मंत्र्यांनी बेळगावात येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ शकतो. देशात कुणालाही कुठेही फिरण्याची मुभा आहे. मात्र सध्याची वेळ योग्य नाही. शांतता राखण्यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, तुमच्या मंत्र्यांना इथे पाठवू नका. आमच्या मते, सीमाप्रश्न आधीच संपला आहे. तरीही महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात गेलाय. त्यामुळे ही लढाई आपण सुप्रीम कोर्टातच लढू. जेणेकरून दोन्ही राज्यांतील नागरिकांचे संबंध तितकेच सौहार्दाचे राहतील,’ बंगळुरूत बोलताना बसवराज बोम्मई यांनी असे आवाहन केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकला होता. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. कित्येक वर्षांपासून सुरु असलेला हा सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला. बेळगाव सीमाभागाचा प्रश्न मागील काही दशकांपासून चिघळत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील भागांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून याच संदर्भात तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावात जाणार असल्याची माहिती आहे. मात्र ‘येथे येऊन राज्याची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवू नका’ असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. यानंतर हा दौरा रद्द झाल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.

मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द केला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, हा दौरा रद्द केला नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत ते म्हटले की, ‘सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा सहा तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवलं आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या घटकेला आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले. मात्र त्यानंतरही शंभूराज देसाई यांना ऐन वेळी दौरा रद्द करावा लागला असल्याच्या चर्चा आहेत.