पुण्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. चारित्र्याच्या संशयावरून अभियंता पतीने आपल्या पत्नीचा चाकू भोकसून खून केला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. ५ ) सकळच्या सुमारास हडपसरमधील भेकराईनगरमध्ये घडली आहे. घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून विवाहीतेच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती राजेंद्र गायकवाड आणि राजेंद्र गायकवाड (वय ३१) हे दाम्पत्य हडपसरच्या भेकराईनगरमध्ये राहत होते. राजेंद्र हा उच्चशिक्षित असून तो अभियंता या पदावर काम करतो. मात्र राजेंद्र हा ज्योतीच्या चारित्र्यावर नेहेमी संशय घेत असायचा. यामुळे त्यांच्यात नेहेमी वाद होत असायचे. या वादातून राजेंद्रने अनेकदा ज्योतीला मारहाण देखील केली होती.
आज (दि. ५ ) पुन्हा एकदा या दोघांमध्ये यावरून जोरदार भांडण झाले. मात्र आजचे भांडण टोकाला गेले आणि यामुळे राजेंद्रला राग अनावर झाला आणि त्याने कसलाही विचार न करता पत्नीच्या पोटात चाकू खुपसला. यात ज्योती गंभीर जखमी झाली तसेच तिथेच तिचा मृत्यू झाला.
हडपसर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योतीचे प्राण गेले होते. हडपसर पोलिसांनी राजेंद्रला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, उच्चशिक्षित तरुणाने असा प्रकार केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.