नाशिकमध्ये मद्यधुंद कारचालकाची ‘सव्वातास’ धुमाकूळ

नाशिक : शहरात सायंकाळच्या सुमारास (दि.१७) एक खळबळजनक घटना घडली आहे. एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा कारचालक नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या उपनगरवरून लेखानगर आणि त्यानंतर लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे भरधाव वेगाने येत असताना ही घटना घडली. साहेबराव निकम असे मद्यधुंद कारचालकाचे नाव आहे. ही घटना नाशिकमधील मुंबई नाका आणि अंबड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कार चालकाला ताब्यात घेतले. या घटनेतील एका गंभीर जखमी व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर इतर दोघांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या मद्यधुंद कार चालकावर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेत कारचे टायर फाटून कारची देखील दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळालं. या घटनेतील जखमी गणेश सत्य या युवकावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गणेश सत्य या युवकाने या घटनेची प्राथमिक माहिती सांगितली.

तब्बल सव्वातास चालू होता कारचा बेधुंद प्रवास

हा कारचालक एका महाविद्यालयातील प्राध्यापक असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राध्यापक अति मद्यपान करून उपनगरपासून दुपारी ४ च्या सुमारास डीजीपीनगर इंदिरानगरपासून लेखा नगरच्या दिशेने निघाला. नशेत असल्याने त्याचे कारवर नियंत्रण नव्हते. त्यामुळे लेखानगर चौकात उभ्या दुचाकी, कारला त्याने धडक दिली आणि पुढे सुसाट निघाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत भरधाव वाहन लेखानगरवरून मुंबई नाक्याकडे येत होतं. तिथे त्याने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली आणि चांडक सर्कलकडे गेला. एका बाजूचा टायर फुटल्यानंतरही कार न थांबवता तो रस्त्यात समोर येईल त्याला भरधाव वेगात धडक देतच जात होता. ही कार चांडकसर्कल कडून गोल्फ क्लबच्या दिशेने गेली. तिथेही उभ्या असलेल्या दोघांना कारने धडक दिली. तो पुन्हा मायको सर्कलवरून चांडक सर्कल कडे गेला. तोपर्यंत पोलिसांची विविध पथकं त्याच्या मागे लागली होती. बेधुंद चालक तोपर्यंत शासकीय विश्रामगृहाच्या दिशेला गेला होता. तेथे वळण घेत त्याने पुन्हा चांडक सर्कलला दोन फेऱ्या मारून काही वाहनांना धडक दिली आणि त्याचवेळी चांडक सर्कलवर पोलिसांनी त्याची गाडी आपली गाडी पुढे लावत अडवली. त्याची गाडी थांबताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या कारचालकाचा हा बेधुंद कार प्रवास सव्वा तास चालला होता आणि अतिशय निर्दयपणे कोणाच्याही जीवाची परवा न करता तो कार चालवतो होता. इतर वाहनधारकांनी त्याच्या कारवर दगड फेकून त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र कारचालक काही थांबायला तयार नव्हता. चांडक सर्कलवर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मद्यधुंद अवस्थेत जीपमध्ये बसवले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात या मद्यपी कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.