जिल्ह्यात पाऊस कायम; धरणसाठ्यांत लक्षणीय वाढ..

नाशिक: गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात वरूण राजाचं जोरदार आगमन झालं आहे. दमदार पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या चार दिसंपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात पुढली काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. अशात जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी बरसत असल्यामुळे धरणसाठ्यांत वाढ होऊन पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या जोरदार पुनरागमानामुळे नाशिककर सुखावले आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात दिवसेंदिवस घट होत होती. त्यामुळे नाशिककरांवर पाणीसंकटाचे सावट होते. मात्र, पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळतं आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा

दारणा धरण ७०.३९ %
मुकणे धरण ५९.६६ %
भावली धरण ७३.८५%
गंगापूर धरण ६६.६४%
कश्यपी धरण ४८.७६%
वाकी धरण २० %
भाम धरण ४९.१९%
वालदेवी धरण ६५.१४ %
कडवा ६९.४३%
आळंदी ८५.०५%
भोजापुर ३७.१२ %
पालखेड ४८.५५%
करंजवण ८०.४७%
ओझरखेड ९६.५३%
वाघाड ९५.२२%
तिसगाव ८७.९१%
पुणेगाव ५९.३९%
चणकापूर ६७.०८%
केळझर ७३.९५%

गंगापूर, दारणा आणि पालखेड या तिन्ही धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने कादवा, दारणा आणि गोदावरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं जात आहे. पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्याचे आदेश देखील प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. आगामी चार दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून नाशिक जिल्हा रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे. अशात धरण प्रकल्पातून विसर्ग सुरू असून त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे तसेच नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी केले आहे.