बंधारा फुटल्याने भातशेती चे प्रचंड नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली

सुरगाणा : तालुक्यातील रघतविहीर फणसपाडा येथील बंधारा फुटल्याने विस ते पंचवीस शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून संततधार सुरु असल्याने नदी, नाले ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. फणसपाडा येथील बंधारा जंगल मुंबई येथील के.जे. सोना वाला ट्रस्ट व फणसपाडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारा बांधण्यात आला होता. आपल्याला शेतीसाठी नव्हे तर निदान उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तरी मिळेल या आशेने पंधरा ते विस शेतक-यांनी यथाशक्तीने दहा ते बारा हजार रुपये लोकवर्गणी जमा करून बंधारा बांधला होता.

सततच्या अतिवृष्टी मुळे सांडव्यातून पाण्याचा निचरा पुरेशा प्रमाणात न झाल्याने बंधारा फुटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. स्वकष्टाने बांधलेला बंधारा वाचवण्यासाठी चाळीस ते पन्नास शेतक-यांनी जेसीबीच्या साहाय्याने सांडवा उकरून पाणी काढण्याचा प्रयत्न रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत जीव धोक्यात घालून केला.अखेर उंच डोंगरावरून पाण्याचा स्रोत वाढल्याने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बंधारा फुटल्याने शेतक-यांचे सर्वच प्रयत्न निसर्ग शक्ती पुढे निष्फळ ठरले. लोकवर्गणीतून बंधारा बांधण्यात आला असल्याने डोळ्यादेखत बंधारा फुटल्याने काही शेतकरी ढसाढसा रडले. बंधारा फुटल्याने त्या खाली असलेल्या विहीरी,बोअर पंप, भाताची आवण, भाताची रोपे, डिझेल इंजिन, मोटार पंप यांचे खुप नुकसान झाले. सुदैवाने दिवसा दुर्घटना घडल्याने जिवितहानी टळली.

शेतकऱ्यांचा भात शेतीचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सादुराम सहारे या शेतक-याची बंधारा खाली असलेली चाळीस फूट खोल विहीर मातीने बुजून सपाट झाली आहे. मोटार पंप आदीचे नुकसान झाले आहे. बंधारा फुटल्याने पाच विहीर बुजलेल्या असून पाच ते सात बोअर पंपाचे नुकसान झाले आहे. अचानक बंधारा फुटल्याने शेतातील लावणी केलेला भात, पेरणी केलेली भात रोपे, खाचरात मुरुम, झाडे, झुडपे, दगड, गोटे पुरात वाहून आल्याने सुपिक जमीन नापीक झाली आहे. वर्षांतून खरीप हंगामात एकदाच पिके घेतली जात असल्याने भात उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. या शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
तलाठी यांना नैसर्गिक आपत्ती विषयी माहिती दिली असून अद्याप ते पंचनामा करण्यास
फिरकलेच नाही या घटनेकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाने झोडपले अन् राजाने फटकारले तर दाद मागायची कोणाकडे अशी शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.