राज्यात भूकंपाचे धक्के..

आज सकाळी सोलापूरमध्ये (Solapur) भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले आहे. सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील भूकंपाचे धक्के जाणवल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलं. सोलापूरजवळ असलेल्या कर्नाटकच्या (Karnataka) विजापूर जिल्ह्यात (Vijapur district) भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. विजापूर जिल्हा उत्तर कर्नाटकमध्ये येतो जो सोलापूरच्या सुमारे १०० किलोमेतर अंतरावर आहे. याच जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असून ४.६ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सकाळी सहा वाजेच्या सुमारास सोलापूरच्या रामवाडी परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीला काय झालं, हे कोणालाच समजत नव्हतं. अचानक धक्के बसल्यामुळे नागरिक भयभीत झाले. काहीतरी गडबड असल्याचे त्यांना कळालं. त्यानंतर हे भूकंपाचे धक्के असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर प्रशासनाने भूकंप झाला असल्याचं सांगत नागरिकांच्या माहितीला दुजोरा दिला. भूकंपाचे धक्के बसल्यामुळे प्रशासनाकडून चौकशीला सुरूवात केली. कुठे काही घडलं आहे का ? याची पाहणी करण्यात येत आहे. अशात सोलापूरसह, पंढरपुर, मंगळवेढा आणि सांगोल्यातही भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. मात्र, कुठेही काहीही नुकसान झाले नसल्याचे माहिती मिळाली आहे.

कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू

सोलापूर जवळील उत्तर कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असून ४.६ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आहे. सुदैवाने उत्तर कर्नाटक किंवा विजापूर जिल्ह्यात भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इतर काही नुकसान झालं आहे की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत होते. कर्नाटकच्या हसन आणि कन्नड जिल्ह्यातही या आधीही भूकंपाचे धक्के जाणवले होते अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात(Hasan district) भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर कन्नड जिल्ह्यातही (Kannad district) भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि याठिकाणी भूकंपाची १.८ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवण्यात आली होती.