आमदार नितीन देशमुख यांचे आरोप खोटे ? शिंदे गटाचे प्रत्युत्तर..

By चैतन्य गायकवाड |

राज्याच्या राजकारणात सध्या मोठे नाट्य चालू आहे. राज्यातील राजकीय संकट अधिकच दाट होताना दिसत आहे. त्यातच काल शिवसेनेचे अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख (Balapur MLA Nitin Deshmukh) नागपूर विमानतळावर परतले होते. त्यांनी प्रतिक्रिया देताना आपण उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी सुरतमध्ये आपल्याला जबरदस्तीने नेण्यात आले होते, असा आरोप देखील केला होता. दवाखान्यात बळजबरीने आपल्याला इंजेक्शन देण्यात आले, असेही ते म्हटले होते. मात्र, आता आमदार नितीन देशमुख यांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नितीन देशमुख यांनी केलेले आरोप खोटे आहे, असा दावा या गटाने केला आहे.

‘आमदार नितीन देशमुख यांना कुणीही जबरदस्तीने नेले आहे. त्यांचे अपहरणही करण्यात आलेले नाही. नितीन देशमुख यांना अकोल्यात परत जायचे होते. त्यांना सन्मानाने परत पाठवले’, असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यांना जर जबरदस्तीने इथे आणण्यात आले असते, तर त्यांना नागपूर विमानतळावर सोडवायला दोन माणसं कशाला पाठवली असती, असे देखील एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांच्या दाव्यावर प्रतुत्तर देताना, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून काही फोटो टाकण्यात आले आहे. या फोटोंमध्ये आमदार नितीन देशमुख इतर आमदारांसोबत विमानात दिसत आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून फोटो टाकण्यात आले…

काय म्हणाले होते आमदार नितीन देशमुख… प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले होते की, “माझी तब्येत पूर्णपणे चांगली आहे. माझा बी.पी. वाढला नव्हता. पोलिसांनी मला बळजबरीने रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यावर २०-२५ लोकांनी मला पकडून माझ्या दंडामध्ये चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन टोचण्यात आले. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. आमचे मंत्री होते म्हणून मी सोबत गेलो होतो. मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी घरी जात आहे. माझ्या मागे गुजरातच्या १०० ते १५० पोलिसांचा पहारा होता. पोलिस आले आणि मला रुग्णालयात नेण्यात आले. अटॅकचे कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला अटॅक आला नव्हता. रुग्णालयात माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्यात आली, असे नितीन देशमुख म्हणाले होते. त्यांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.