By चैतन्य गायकवाड |
शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या बंडाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या अर्ध्याहून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. सर्वात आधी सूरत, त्यानंतर गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये बसून राजकीय सूत्र हाताळणाऱ्या शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?, राज्य सरकार कोसळणार का?, शिवसेनेचे आता काय होणार?, तसेच भाजप आणि शिवसेना सत्तेत येणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र, राज्यातील हे राजकीय संकट अधिक गडद हेत असताना, या बंडाचे ‘नायक’ मंत्री एकनाथ शिंदे याची देशभर चर्चा सुरु झाली आहे. इतकेच काय तर, एकनाथ शिंदे हे नाव आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) सुद्ध गाजत आहे. या निमित्ताने का होईना, पण एकनाथ शिंदे हे प्रसिद्ध होत आहेत. ठाण्याचे वाघ म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांचे नाव आज राज्याच्याच नव्हे तर, देशाच्या सीमा पार करून विदेशात देखील पोहचले आहे. त्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु असून गुगलवर देखील त्यांच्याविषयी सर्च केलं जात आहे. जगभरातील जवळपास ३३ देशांमध्ये गेल्या ३ दिवसांत ५ नेत्यांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. या पाच नेत्यांमध्ये चक्क एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. पाकिस्तानात ५४ टक्के सर्च एकनाथ शिंदे यांच्याविषयी झाले आहे. आश्चर्य वाटलं ना ! पण पुढेही वाचा. फक्त पाकिस्तान नव्हे तर सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान, कॅनडा या देशांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या नावाचा शोध घेतला जात आहे.
पाकिस्तानातील गुगलवर सर्वात जास्त (Google Search) सर्चिंग एकनाथ शिंदे यांच्या नावाचं झाल्याची माहिती समोर आली आहे. गुगलवरील सर्वाधिक ५४ टक्के सर्च एकनाथ शिंदे यांच्या नावाने झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात फक्त याच नावाची सर्चिंग केली जात असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानं ४४ टक्के सर्चिंग झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावाने देखील सर्च झाले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने सुद्धा पाकिस्तानात सर्चिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.