उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आणि निकाल एकाच दिवशी..

By चैतन्य गायकवाड

सध्या देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) एक महत्त्वाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक (Election for Vice President) जाहीर केली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ( M. Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यापूर्वी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्टला मतदान (voting) होणार आहे आणि निकालही (result) त्याच दिवशी जाहीर होईल. तर, दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडूक आयोगाने ही माहिती दिली.

उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम..
केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उपराष्ट्रपती पदासाठी ५ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १९ जुलै निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून २० जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २२ जुलै ही अंतिम तारीख आहे. या पदासाठी ६ ऑगस्टला मतदान होईल आणि निकाल देखील त्याच दिवशी जाहीर करण्यात येईल. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अनुप चंद्रा पांडे यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यमान उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार..
भारताचे उपराष्ट्रपती हे देशातील राष्ट्रपती यांच्यानंतर दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारतीय संविधानाच्या कलम ६८ नुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात. तसेच उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती देखील असतात. १० ऑगस्ट २०१७ रोजी व्यंकय्या नायडू यांची १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार आहे. राज्यघटनेच्या कलम ६८ नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया होणं आवश्यक आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी कोण मतदान करते..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभेतील निर्वाचित खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. राज्यसभा २३३ आणि लोकसभेतील ५४३ निर्वाचित खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. १६ व्या उपराष्ट्रपतींसाठी निवडणूक प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण होईल.