मुंबई । प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळते आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक कर देणारे राज्य असूनही केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक कर परतावा मिळत नाही. याशिवाय केंद्राकडे वस्तू सेवा कराचे (GST) थकीत राहिलेले २६ हजार कोटी रुपयेही महाराष्ट्राला अद्याप दिले नाहीत, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची खदखद मांडली आहे.
कोविड-१९ उपाययोजनांवरुन आयोजित करण्यात आलेल्या सर्व राज्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी इंधन दरवाढीवरुन राज्यांचा थेट उल्लेख केला. या वेळी इंधन दरवाढीचा विषय काढत पंतप्रधानांनी म्हटले की, केंद्र सरकारने इंधन दरावरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू आदी राज्यांनी पेट्रोल, डिझेल अशा इंधनावरील व्हॅट (VAT) कमी करावा. मी कोणावरही टीका करत नाही राज्यांनी आता VAT कमी करून लोकांना लाभ देण्याची मी विनंती करतो, असेही ते म्हणाले.
राज्यांचे नाव घेऊन थेट उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी थेट राज्याच्या मनातील खदखदच बोलून दाखवली. ज्या राज्यातून सर्वाधिक जीएसटी केंद्राला मिळतो. त्या राज्यालाच केंद्र सरकार सापत्न भावाची वागणू कशी काय देते? असा थेट सवालही ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला.
केंद्रीय कराच्या एकूण ५.५ टक्के रक्कम महाराष्ट्राला मिळते. थेट कराचा (डायरेक्ट टॅक्स) विचार करता महाराष्ट्र ३८.०८ टक्के कर देतो. आकडेवारी काढायची तर महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक १५ टक्के जीएसटी देतो. थेट करआणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र करुन पाहिले तर महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. असे असूनही केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी अद्यापही थकीत आहे. केंद्राने हे पैसे लवकरात लवकर परत करावेत, अशी आठवणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केली.