खळबळजनक..! 7 वर्षाच्या चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या

पुणे : जिल्ह्यात मावळ येथील कोठारणे गावातील एका सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे . नराधमाने चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केली आहे .याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपी तेजस दळवी ( वय.24 ) याला पकडले आहे. तसेच पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याप्रकरणी आरोपीची आई सुजाता दळवीयांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आले आहे .

सात वर्षीय मुलगी ही दोन ऑगस्ट पासून बेपत्ता होती मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पोलीस तिचा कसून शोध घेत असताना अखेर बुधवारी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेमागे आक्षेपार्ह अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला .आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली .या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला त्यानंतर त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले .सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच तो त्यांच्या शेजारी राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे . पोक्सो कायद्यान्वये कलम 363 ,302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिकांकडून नराधमाला लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे .आरोपीला शिक्षा करण्यात यावा या मागणीसाठी गावातील नागरिकांकडून मोर्चा देखील काढण्यात आला .तसेच सामाजिक संघटनांकडून या घटनेचा शोक व्यक्त करत निषेध करण्यात आला आहे .तसेच हि घटना जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी निष्पाप पिढीत चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी मोर्चातून नागरिकांनी केली आहे.