खळबळजनक..! अवघ्या ९ वर्षाच्या मुलीवर ५६ वर्षीय नराधमाने केला बलात्कार

नाशिक : शहरातील सिडको परिसरातील अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधी पोस्को अन्वये बलात्कार, व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यन्वये (ॲट्रोसिटी) अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर त्र्यंबक पाटील (५६, रा. सिडको, नाशिक) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित चिमुरडीला वडील नाहीत. तसेच, संशयित ज्ञानेश्‍वर पाटील हा पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा असून, घराजवळच राहत आहे. संशयिताने पीडित अल्पवयीन मुलीला रस्त्यात एकटीला अडविले आणि पीडितेच्या घराच्या पाठीमागे नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच, तुला वडील नाहीत. सदरचा प्रकार तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन. पोलिसांना सांगितले तर घरातील सर्वांना संपवून टाकीन अशी धमकीही दिली.

याप्रकाराचा चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पीडितेच्या आईने अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार, संशयिताविरोधात पोस्को (बाल लैगिंग अत्याचार संरक्षण अधिनियम) अन्वये बलात्कार व ॲट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख हे करीत आहेत.