खळबळजनक..! गुजरातमध्ये १,१२५ कोटीं रुपयांचे ड्रग्स जप्त!

गुजरातमध्ये अनेक वेळा ड्रग्स सापडले आहे त्यामुळे गुजरात हे भारतातील ड्रग्ज तस्करीचे प्रमुख केंद्र बनल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून ते महिन्यापासून अनेकदा हजारो कोटी रुपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज गुजरातच्या बंदरांवरुन जप्त करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा ड्रग्ज पकडण्यात आले आहे. गुजरात एटीएसच्या कारवाईत १,१२५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे.

तसेच दोनच दिवसापूर्वी मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. आणि आता पुन्हा एकदा १,१२५ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यामुळे गुजरात मध्ये हे नेमके सुरु काय आहे. यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

याप्रकरणी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने वडोदऱ्यातील एका बांधकाम सुरु असलेल्या फॅक्टरीवर मंगळवारी छापा टाकला इथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये २२५ किलो मेफेड्रोन ज्याची किंमत १,१२५ कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांनाही ताब्यात घेतले असून त्यांची कसून तपासणी सुरु आहे.

गुजरात एटीएसचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी या घटनेची सखोल माहिती दिली आहे ते म्हणाले, जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ भरुच येथील गुजरात औद्यागिक विकास महामंडळ अर्थात GIDC सायखा इथल्या एका केमिकल कंपनीमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्या फॅक्टरीमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे ते सुरत येथील महेश वैश्नव आणि वडोदरा येथील पियूष पटेल नामक व्यावसायिकांच्या मालकीचे आहे. तसेच राकेश मकानी, विजय वसोया आणि दिलीप वघासिया हे भरुच इथल्या प्रकल्पाचे मालक आहेत. या सर्व प्रकल्पाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.

२०१७ : गुजरातच्या समुद्रात एका व्यापारी जहाजातून १५०० किलो हेरॉईन जप्त

२०१८: ५ किलो हेरॉईनसह दोघांना अटक

२०२० : १७५ कोटी रुपयांच्या ३५ किलो हेरॉईनसह पाच पाकिस्तानींना अटक

2021: १५० कोटी रुपयांच्या ३० किलो हेरॉईनसह 8 पाकिस्तानी पकडले गेले.

२०२२: मुंद्रा बंदरातून ५० कोटी रुपयांचे ५२ किलो कोकेन जप्त

मिडिया रिपोर्टनुसार हा आतापर्यंतचा आकडा आहे. त्यामुळे गुजरात राज्य हे अमली पदार्थ विक्रेत्यांसाठी पसंतीचे ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होते.