खळबळजनक..! नाशकात लष्करी हद्दीत दुसऱ्यांदा ड्रोनच्या घिरट्या

नाशिक: शहरात पुन्हा एकदा लष्करी हद्दीत ड्रोन ने रेकी करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरा ड्रोन उडवण्यात आला आहे. नाशकात हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असून याने आता खळबळ उडाली आहे. DRDO तिल एका हवालदाराने दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात अज्ञात ड्रोन उडाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका स्थानिक नागरिकाने हा ड्रोन बघितला असून याची माहिती DRDO तील अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानंतर DRDO तिल एका हवालदाराने दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विमान अधिनियम १९३४ चे कलम ११ नूसार आणि कोणतेही परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशकात रेकी होतेय?

नाशिकमधील लष्करी हद्दीत परवानगी नसताना ड्रोन उडवण्याची ही दुसरी घटना असून अश्या प्रकारची घटना २५ ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटर परिसरात ड्रोन उडाला होता. अजून यातील आरोपींचा शोध लागेलला नसतांनाच ही दुसरी घटना समोर येत आहे. त्यामुळे नाशकातील लष्करी ठिकाणांवर रेकी करण्याचा संशय बळावत चालला आहे. या दोन्ही घटनांमध्ये सारखाच प्रकार घडला असून नाशकातील लष्करी ठिकाणांवर रेकी होत आहे त्यामुळे आता खळबळ उडाली आहे. अधिकारी आता अगदीच सावध झाले असून पोलीस घटनेचा तपास करत आहे.