नाशिकजवळ भीषण अपघात; 3 जण जखमी; महामार्गावरच ट्रक उलटला

नाशिक-मुंबई महामार्गावर लोखंडाने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना पहाटेच्या सुमारास गोंदे येथील सॅमसोनाइट कंपनी जवळ ट्रक क्रमांक एम. एच. ४६ एफ ६२०५ हा ट्रक महामार्गावरील खड्ड्यात जाऊन आदळला. यात ट्रकची स्टेरिंग रॉड तुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात ओम प्रकाश सिंग (वय २८) रफिक रहीम खान (वय ४५) दिलीप कुमार सिंग (वय ३९) राहणार उत्तर प्रदेश हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस केंद्र घोटी, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे मोफत रुग्णवाहिक तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी घोटी येथे ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल केलं होतं. या ठिकाणी जखमींवर पुढील उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऐन नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक पलटी झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अपघाताचा परिणाम महामार्गावरील इतर प्रवाशांवर झाला. एकेरी मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे. अशात वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघात ग्रस्त ट्रक बाजूला काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

पहा व्हिडीयो :

खड्डेमय महामार्ग मृत्यूचा सापळा ?

नाशिक-मुंबई महामार्गाची यंदाच्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रत्येक किलोमीटर अंतरावर छोटे-मोठे खड्डे नजरेस पडत आहेत. खास करुन वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी, कसारा तसेच शहापूरजवळ तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत? असाच प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रोज छोटे-मोठे अपघातही खड्ड्यांमुळे होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
एकंदरीतच राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था बघता गाव खेड्यांमधील रस्त्यांची काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. सध्या तरी एखादी मोठी दुर्घटना किंवा अपघात होण्याआधी संबंधित विभागाने नाशिक-मुंबई महामार्गावरील हे खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे, यासोबतच सरकारने यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करणेही आवश्यक आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी एका दुचाकीवर पाठीमागे बसललेल्या तरुणाचा बळी गेल्याची घटना घडली होती. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली पूलाजवळ घडली होती. याठिकाणी खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या या पाठीमागे बसललेल्या तरुणाच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ब्रिजेशकुमार जैस्वार उर्फ मुनी काका असे मृत दुचाकीस्वराचे नाव असून तो उल्हासनगरमध्ये राहणारा होता.