सासरे विधान परिषद सभापती; आता जावई होणार विधानसभा अध्यक्ष?

By चैतन्य गायकवाड

मुंबई : काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी शिंदे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. या सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारने बाजी मारली, तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल.

रविवारी विधानसभा अध्यक्षांची (Speaker of the Legislative Assembly) निवडणूक होईल. यासाठी निवडणुक अर्ज भरण्याची मुदत शनिवार पर्यंत आहे. यासाठी सत्ताधारी भाजपा-एकनाथ शिंदे गटाचा विधानसभा अध्यक्ष पदासाठीचा उमेदवार निश्चित झाला आहे. मुंबईतील कुलाबाचे (Kulaba, Mumbai) आमदार राहुल नार्वेकर (MLA Rahul Narvekar) यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून, अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरणार आहे. राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) आणि नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत दाखल केला. अध्यक्षपद हे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार असून भाजपने हे पद स्वतःकडे राखले आहे. राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती (Speaker of the Legislative Council) रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांचे जावई आहेत. महाराष्ट्रात प्रथमच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती अशी जावई-सासरे जोडी दिसणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून राधाकृष्ण (Radhakrishna Vikhe Patil) विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकारणाचा अनुभव बघता त्यांचे नाव जाहीर होण्याची चर्चा होती. मात्र भाजपने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत नार्वेकरांना संधी दिली आहे.

कोण आहे राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर हे मूळचे शिवसेनेचे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर, त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार झाले. लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेत संधी दिली. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आमदार झाले.