अंतिम मतदार यादी लांबणीवर पडणार. हे आहे कारण..

By Pranita Borse

नाशिक: राज्यासह नाशिकमध्ये (Nashik) आगामी मनपा निवडणुकांच्या (NMC elections) प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर या याद्यांवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, आता अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी लांबणीवर पडली असून ९ जुलै ऐवजी १६ जुलैला ही यादी प्रसिद्ध होणार आहे.

नाशिकचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (NMC commissioner/administrator Ramesh Pawar) यांनी ३००० पेक्षा जास्त हरकतींची नोंद झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम प्रसिद्धीसाठी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) आयुक्त रमेश पवार यांची ही मागणी मान्य करत, अंतिम प्रसिद्धीसाठी मुदतवाढ दिली आहे.

कोणत्या विभागातून किती हरकती ?

नाशिक महानगरपालिकेला मतदार याद्यांवर सुमारे ३४४७ अशा विक्रमी हरकती प्राप्त झाल्या आहे. यात,

सिडकोतील – २४३३, (सर्वाधीक हरकती)
पूर्व विभागात – २४४
पश्‍चिम विभागात- ४६
पंचवटी – ३९६
नाशिकरोड – २२२
सातपूर – १५५
ट्रू व्होटर्स ॲपवर – ३५२, अशा सर्व ३४४७ हरकती आल्या आहेत. अशात हरकतींचा मोठा डोंगर उभा राहिल्याने ९ जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे नाशिक महापालिका आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत निवडणुक आयोगाकडे मुदतवाढीची मागणी केली होती.

पावसामुळेही अंतिम प्रसिद्धी लांबणीवर

नाशिकसह राज्यात इतर महापालिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहे. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू असलेला मुसळधार पाऊस देखील अंतिम मतदार यादीच्या लांबणीसाठी कारणीरणीभूत ठरत आहे. कोकणासह मुंबई आणि राज्यातील इतर काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, हरकतींची पडताळणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. अशात हवामान खात्याने पुढील चार दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्याने हरकतींच्या पडताळणीसाठी अजूनच अडचणी वाढ होईल म्हणून ही मुदतवाढ दिली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.